वरुड- तिहेरी अपघातात मोटर सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वरुड ते अमरावती मार्गावरील नागझिरी फाटा नजीक काल (ता.२४) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी बेनोडा (शहीद) पोलिस अधिक तपास करीत आहेत. सचिन संजय धुर्वे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नांव आहे.
काटोल आगाराची एस.टी.बस क्र.एम.एच.४० वाय ५२३२ ही नागपूर ते मोर्शी येथे जाणारी बस रात्री ९ वाजता दरम्यान नागझिरी फाटा नजीकच्या नागमंदीर पुलासमोर मोटार सायकल चालक आपली दुचाकी वाहन क्र.एम.एच.४० एम ७९३२ ने मोर्शीकडुन वरुडकडे जात असतांना चालकाचे बाजुला समोरासमोर धडकला. एस.टी.चालकाने त्याचे ताब्यातील वाहन डावे बाजुला घेतले असता वरुड येथून अमरावतीकडे जाणा:या टाटा एस क्र.८५०९ ला सुद्धा घासुन पुढे गेली. त्यात टाटा एसचे सुध्दा किरकोळ नुकसान झाले. या अपघातामध्ये मोटार सायकल चालक सचिन संजय धुर्वे (२८) रा.गेहूबारसा, ता.पट्टण, जि.बैतुल हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यास ताबडतोब बेनोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिकेने वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी मोटर सायकल चालकाची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारी वरुन बेनोडा (शहीद) पोलिसांनी एम.एच.४० एम ७९३२ क्रमांकाच्या बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.