वरुड – जनतेला लोकशाही हवी आहे, मोंदीची हुकूमशाही उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आजचे वातावरण बघता ही निवडणुक शेवटची ठरु नये, याची आम्हाला चिंता आहे. यावेळी ४०० पारचा नारा मुलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्याशिवाय राहणार नाही. मी अनेक प्रधानमंत्री पहिले, त्यांचे सोबत काम पहिले, ते सर्व लोकशाहीची प्रतिष्ठा वाढविणणारे होते परंतु गेल्या १० वर्षातील अनुभव विचार करायला लावणारे आहे. उत्पादन खर्चाचा विचार करुन हमीभाव मिळाला पाहिजे, अशी सातत्याने मागणी असूनही त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. सोयाबीन, तूर, कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहेत मात्र याची उत्तरे यांचेकडे नाही, संत्र्याच्या बाबतीत हे सरकार केवळ बघ्याची भुमिका घेत आहेत त्यामुळे त्यांना हद्दपार करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
ते शहरातील अमरावती रस्त्यावरील ग्रीन पार्क सिटी येथे वर्धा इंडिया आघाडीचे लोकसभा उमेदवार अमर काळे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर वर्धा लोकसभा उमेदवार अमर काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, पक्ष निरिक्षक पंकज पटेल, माजी आमदार शरद तसरे, रमेश बंग, किशोर कन्हेरे, संगिता ठाकरे, नितेश कराळे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पावडे, उपसभापती बाबाराव मांगुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, अनिल ठाकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू, उपजिल्हाप्रमुख योगेश घारड, तालुकाप्रमुख विजय निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळु पाटील, माजी जि.प.सभापती गिरीश कराळे, माजी पं.स.सभापती विक्रम ठाकरे, कमलाकर पावडे, माजी नगरसेवक धनंजय बोकडे, माजी जि.प.सदस्य राजेंद्र बहुरुपी, बंडु साऊथ, अॅड.प्रणिता चव्हाण, प्रकाश बोंडे, अनिल वानखडे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज गेडाम, राकाँ जिल्हाध्यक्ष गौस अली, अनिल कनाटे, जावेद भाई आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वत:च्या ताकदीवर आमदार, खासदार निवडून आणता येणार नाही म्हणुन २ वर्षांपूर्वीपासून भाजपाने तोडाफोडीच राजकारण सुरु केल. ईडीची भीती दाखवुन राष्ट्रवादी फोडली पण त्याचा फायदा झाला नाही. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले नाही, बेरोजगारी वाढत गेली. मिहान मधील उद्योग गुजरातला नेले. कापूस गाठी आयात केल्या संत्रा वरील निर्यात शुल्क वाढविले म्हणुन संत्रा, कापसाला बाजारभाव मिळत नाही. शेतक:यांचे उत्पन दुप्पट करण्याचं आश्वासन दिल होतं मात्र ते कुठेच दिसत नाही. उलट शेतक:यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. धनगर समाजाला गेल्या १० वर्षात आरक्षण मिळालं नाही. प्रत्येकाला घरकुल देण्याचा आश्वासन दिल परंतु अनेकांना मिळालं नाही त्यामुळे आश्वासनाला बळी पडू नका, ईडीचा धाक दाखविला जात आहे. केजरीवाल यांना खोटया केसमध्ये फसविले, असे प्रतिपादन माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केले.
यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजपा ही भ्रष्टाचार जोडो पार्टी झाली असून ते शेतक:यांच्या उत्पन्न वाढ व बाजारभावावर बोलत नाही. पवार साहेबांनी तेव्हा ७० हजार कोटीची कर्जमाफी दिली. देशात शेतक:यांनी केलेल्या आंदोलनात ७०० पेक्षा जास्त शेतकरी मृत्युमुखी पडले पण याची खंत हे सरकार कधी बाळगत नाही.
याप्रसंगी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख, वर्धा लोकसभा उमेदवार अमर काळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.